महाराष्ट्र ग्रामीण

ते गप्पा मारत बसले होते… इतक्यात आमदार आला आणि थेट पिस्तुल काढून… रात्री नेमकं काय घडलं?; सीसीटीव्हीत काय दिसलं?

उल्हासनगर : तारीख : 2 फेब्रुवारी, वेळ : रात्रीचे 10 वाजलेले, स्थळ : उल्हासनर हिललाईन पोलिस स्टेशन.. आतमध्ये बऱ्याच खुर्च्या मांडलेल्या,  पण माणसं मात्र तीनच. पांढरा शर्ट घातलेला माणूस मोबाईलमध्ये मग्न तर निळा शर्ट घातलेला आणि भगवा शर्ट घातलेला, असे दोन तरूण तिथे लावलेला टीव्ही पाहण्यात मग्न होते. सगळं काही शांत होतं , तेवढ्यात पिवळ्या रंगाचा कुर्ता घातलेला एक माणूस तोऱ्यात चालत आला आणि त्याने खिशातून पिस्तुल काढून थेट त्यांच्यावरच ताणली. पिस्तुल पाहून घाबरलेले तिघे ताडकन उठले आणि त्यांनी मागच्या दारातून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. खुर्च्य पडल्या, जमीनीवरून पाय सटकले आणि तिघेही एकमेकांमध्ये अडकून त्याच खोलीत पडले.

धाड-धाड-धाड… एकामागोमाग एक गोळ्या गणपत गायकवाडांनी नेम धरून महेश गायकवाड यांच्यावर चालवल्या. जखमी अवस्थेत महेश गायकवाड तिथेच कोसळले तर पांढरा शर्ट घातलेला माणूस कसाबसा बाहेर पडला. महेश गायकवाड कोसळल्याचे दिसत गणपत गायकवाडांनी त्यांचा मोर्चा दुसऱ्या इसमाकडे वळवला. भगव्या रंगाचा शर्ट घातलेला तो माणूस पळून जाताना, समोरच्या भिंतीला धडकून खाली कोसळला आणि गणपत यांनी त्याच्यावरही बेछूट गोळीबार केला.

एवढं होऊनही गणपत गायकवाडांचं समाधान काही झालं नाही, त्यांनी तीच पिस्तुल घेतली आणि पुढे सरकले. त्यात पिस्तुलाने त्यांनी महेश गायकवाड यांच्या डोक्यात प्रहार केले. एक-दोन-तीन वार करूही ते थांबले नाहीत, त्याला मारतच राहिले. त्यांना राग एवढा अनावर झाला होता, की समोरचा माणूस खाली कोसळलाय याचंही त्यांना भानच उरलं नाही, त्यांचे वार सुरूच होते. तेवढ्यात बाहेरून पोलिसांनी आतल्या खोलीत धाव घेतली. त्यांच्यामागोमाग आणखी दोन-तीन जण आत घुसले आणि त्यांनी गणपत गायकवाडांना पकडून बाजूला केलं, त्यांच्या हातातील पिस्तुल खेचून घेतलं.

सीसीटीव्हीमध्ये थरार कैद

शुक्रवारी रात्री कल्याण-डोंबिवलीत परिसरात मोठा राजकीय राडा झाला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पदाधिकाऱ्यावर, महेश गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या सगळ्या झटापटीची, अंगावर येणाऱ्या क्रौर्याची सगळीच दृष्य त्या पोलिस स्टेशनच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहेत. तिथला थरार पाहून अंगाचा थरकाप उडतो.

महेश गायकवाड यांची प्रकृती कशी ?

या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ठाण्यातल्या ज्युपीटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढल्या. मात्र त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळलेला नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय, अशी माहिती ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.तर त्यांच्यासोबत असलेले, राहुल पाटील हे सुद्धा गोळीबारात जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या.

आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या

आपण आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा गणपत गायकवाड यांनी केला. “मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता” अस गणपत गायकवाड यांनी म्हटलं. “ काल संध्याकाळी महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला” असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे.

गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

या गोळीबारानंतर उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीसांनी गोळीबार व हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना कळवा येथील पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तर आणखी तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

या हल्ल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही केला. त्यानंतर या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button