राम मंदिरासाठी धनवर्षा, दानाची मोजणी करताना थकताय 14 कर्मचारी
अयोध्या: राम मंदिरात 22 जानेवारीला रोजी रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला झाल्यानंतर मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे. मंदिरात आता लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. यामुळे मंदिराच्या दानभेटीत धनवर्षा सुरु आहे. ऑनलाईन पद्धतीने मंदिरासाठी मोठे दान येत आहेत. मंदिरात येणाऱ्या देणगीची मोजणी करण्यासाठी 14 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्यात 11 बँकेचे कर्मचारी तर 3 बँकेचे कर्मचारी आहेत. दानपेटीत भरभरुन दान येत असल्यामुळे दिवसभरात अनेक वेळा दानपेटी रिकामी करावी लागत आहे. 14 कर्मचारी दान मोजून थकून जात आहेत.
10 संगणकीय काउंटरवर देणगी
राम मंदिर ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आतापर्यंत जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक रामभक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत दान पेटीत भक्तांनी 8 कोटींपेक्षा अधिक दान दिले आहे. तसेच 3.50 कोटी रुपये ऑनलाइन मिळाले आहे. रामभक्त चार दानपेटीत दान देत आहेत तसेच उघडण्यात आलेल्या 10 संगणकीय काउंटरवर देणगी देण्यासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. दानपेटीत आलेली देणगी मोजण्याची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीत होते असते, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.
आधी 20 ते 25 हजार आता दोन ते अडीच लाख
राम मंदिरात दर्शनासाठी आधी 20 ते 25 हजार भाविक येत होते. आता मागील दहा दिवसांपासून हा आकडा दोन ते अडीच लाख रोज होत आहे. आधी रोज 20 ते 25 हजार रुपये देणगी येत होती. आता गेल्या दहा दिवसांत 25 कोटी रुपये आले आहेत. सर्व बँक कर्मचारी दान केलेल्या पैशांची मोजणी करतात आणि दान केलेले पैसे दररोज संध्याकाळी राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होते.
राम मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. यामुळे देणगी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशातूनच नाही तर परदेशातून ही लोकं येत आहेत.