महाराष्ट्र ग्रामीण

मॉरिससोबतच्या वादावर अभिषेक घोसाळकर यांनी फेसबुक लाईव्हवर सांगितलं होतं की…

मुंबई : मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा पडसाद सर्वत्र उमटले आहेत. फेसबुक लाईव्हमध्ये सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे प्रत्येक जण हादरून गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडावर माजी नगरसेवर अभिषेक घोसाळकर आणि मॉरीसभाईच्या नावाची चर्चा होत आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई या दोघांचा या गोळीबारात मृत्यू झाला. प्रत्येक जण विचार करत आहे की, नेमकं असं काय झालं की इतक्या टोकाचा निर्णय घेण्यात आला. हा मॉरिसभाई नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते तर असं करण्याचं कारण काय? राजकीय इच्छेपोटी तर असं पाऊल उचललं नाही ना असे एक ना अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

गोळीबार करणारा मॉरिसभाई कोण?

मॉरिसभाई हा मुंबईतल्या बोरीवलीतील आयसी कॉलनीतील रहिवासी होता. व्यवसायिक असून त्याने स्वत:ची वेगळी अशी छबी तयार केली होती. समाजसेवक म्हणून गेली काही वर्षे समाजात वावरत होता. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत होता. इतकंच काय तर करोना काळात मॉरीसभाईने घराघरात जाऊन अन्नधान्याचं वाटप केलं होतं. त्याच्या या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. मॉरिसभाई बीएमसी इलेक्शनसाठी जोरदार तयारी करत असल्याचं यातून दिसत होतं. याच वॉर्डमधून अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर या नगरसेविका होत्या. त्यामुळे राजकीय वादाला गेल्या काही दिवसांपासून तोंड फुटलं होतं. मॉरिसने अपशब्द वापरल्याप्रकरणी तेजस्विनी घोसाळकर यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली होती. त्यानंतर त्यांच्यात समेट झाला होता.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जून 2022 मध्ये मॉरिसभाई यांच्या कतृत्वाला डाग लागला आणि वेगळं वळण आलं. 48 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यामुळे अमेरिकेतून मायदेशी परतल्यानंतर जून 2022 साली त्याला विमानतळावर अटक करण्यात आली. या प्रकरणात ब्लॅकमेल, धमकी आणि 88 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर मॉरिसभाईने आपल्या कामाला पुन्हा सुरुवात केली होती.

फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर काय म्हणाले?

“मॉरिस आणि मी एक स्टेज शेअर करत आहोत हे पाहून लोकांना आश्चर्य वाटेल. मात्र जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही आयसी कॉलनी, कांदरपाडा आणि शेजारच्या परिसरांसाठी जे सर्वोत्तम आहे ते करू.,” असं अभिषेक घोसाळकर सुरुवातीला कॅमेरावर म्हणाला.

“आमच्यामध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्येही बरेच गैरसमज होते, पण आता आम्ही एकत्र आलो आहोत. खूप काम करायचे आहे आणि ही फक्त सुरुवात आहे,” असंही अभिषेक घोसाळकर पुढे म्हणाला. तितक्यात मॉरीसभाईने गोळ्या झाडल्या आणि स्वत:ही आत्महत्या केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button