महाराष्ट्र ग्रामीण

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली, अजिंक्यतारा चमकणार…

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. आपआपली रणनिती तयार केली जात आहे. संभाव्य उमेदवार लक्षात घेऊन त्याच्यासमोर तगडा प्रतिस्पर्धी देण्याचा प्रयत्न सुरु आहे. कल्याण लोकसभा मतदार संघावर राज्याचे लक्ष असणार आहे. या ठिकाणांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यामुळे ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा नगरीत अजिंक्यतारा चमकणार, असे बॅनर लावले गेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये लक्ष केंद्रीत केले आहे.

कल्याण लोकसभा नगरीत ठाकरे गटाचे वादळ धडकणार

विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना शिंदे ची असा निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही संपर्क यात्रेची सुरुवात कल्याण लोकसभेतील याच मध्यवर्ती शाखेवरून केली होती. खासदार संजय राऊत यांनीही काही दिवसांपूर्वी कल्याण दौरा नियोजित करत डोंबिवलीत देखील कार्यक्रमांमध्ये शिंदे पिता-पुत्रांवरती टीका करत श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जाणार नाही, असे विधान केले होते. आता ठाकरे गटातील युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे कल्याण दौऱ्यावर येत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. कल्याण पूर्व भागात शिवसेना मध्यवर्ती शाखेला भेट देत आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.

आदित्य ठाकरे काय बोलणार

आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा असून नेमका या दौऱ्यात कल्याणमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आदित्य ठाकरे काय बोलणार? कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीसाठी काय मंत्र देणार हे महत्त्वाचे राहणार आहे.आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाखेबाहेर स्टेज देखील बांधण्यात येणार आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महेश गायकवाड यांचा वाद झाला होता. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणावर आदित्य ठाकरे काय बोलणार? हे ही पाहावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button