ज्ञानवापीच्या तळघरात शिवलिंगासोबतच करण्यात आली या देवतांचीदेखील पूजा, रात्रीतून नेमकं काय घडलं?
वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी (Gyanvapi) परिसरातील व्यासजींच्या तळघरात आजपासून पूजा सुरू झाली आहे. तब्बल 31 वर्षांनंतर या तळघरात पुन्हा दीपप्रज्वलन करण्यात आले, आरती करण्यात आली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाने संपूर्ण बंदोबस्त ठेवला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने बुधवारी 31 जानेवारीला दुपारी ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला दिला होता. तसेच प्रशासनाला 7 दिवसांत सर्व व्यवस्था करण्यास सांगितले होते. त्यानंतर रात्री 12 ते 12:30 च्या दरम्यान वाराणसी पोलीस-प्रशासनाने व्यास तळघर उघडून पूजा सुरू केली.
अशा प्रकारे करण्यात आली पूजेची व्यावस्था
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पंचगव्याने तळघर शुद्ध करण्यात आले. यानंतर षोडशोपचार पूजा झाली. मूर्तींना गंगाजल आणि पंचगव्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर महागणपतीचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्व मूर्तींना चंदन, फुले, धुप-दीप अर्पण करून आरती करण्यात आली. व्यासजींच्या तळघरात सुमारे अर्धा तास पूजा चालली.
दैनंदिन पूजेबद्दल सांगायचे तर आजपासून पंचोपचार पूजा सुरू झाले आहेत. यामध्ये देवाच्या मूर्तीला स्नान घालणे, चंदन लावणे आणि फुले अर्पण करणे यांचा समावेश आहे. नैवेद्य, धुप दीप लावून पूजा केली जाते. ही पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाईल. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर विधीनुसार मंगळा गौरीची पूजा करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडली होती. जी न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू होऊ शकली.
या मूर्तींची पूजा करण्यात आली
शिवलिंग, हनुमान आणि गणेश यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. तसेच देवीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली. एकूण 5-6 मूर्तींचे पूजन करण्यात आले. हा पूजा विधी काशी विश्वनाथच्या पुजाऱ्यांनी पार पाडला. यावेळी परिसराच्या आत आणि बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त होता. सध्या रात्रीच्या पूजेनंतर सकाळपासूनच भाविक येत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी परिसरातील तळघरात नियमित पूजेला परवानगी दिल्यानंतर रात्री उशिरा तळघर बॅरिकेड्समधून उघडण्यात आले. यासाठी डीएम एस. राजलिंगम, पोलीस आयुक्त अशोक मुथा जैन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रात्रभर उभे होते. दुपारी 1.50 वाजता आवारातून बाहेर आलेले डीएम म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे.
ज्ञानवापी संकुलातील तळघरात पूजेचा हक्क सापडल्यानंतर तळघराचे खास चित्र समोर आले आहे. ज्यामध्ये पुजारी आणि पोलीस दिसत आहेत. 1993 नंतर प्रथमच येथे पूजा करण्यात आली. दुसरीकडे, मुस्लिम पक्षाने जिल्हा न्यायालयाच्या उपासनेचा अधिकार देण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
एएसआयच्या सर्वेक्षणात सापडले आहेत महत्त्वपूर्ण पुरावे
उल्लेखनीय म्हणजे नुकताच ज्ञानवापी येथे केलेल्या ASI सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. यावर हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर म्हणाले की, जीपीआर सर्वेक्षणात एएसआयने म्हटले आहे की, येथे मोठे भव्य हिंदू मंदिर होते. सध्याच्या रचनेपूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात होते. ASI च्या मते, सध्याच्या संरचनेची पश्चिम भिंत पूर्वीच्या मोठ्या हिंदू मंदिराचा भाग आहे. येथे एक पूर्व-अस्तित्वात असलेली रचना आहे जी त्याच्या वर बांधलेली आहे. अहवालाचा हवाला देत हिंदू बाजूने म्हटले आहे की, खांब आणि प्लास्टरचा थोडासा बदल करून मशिदीसाठी पुन्हा वापर करण्यात आला आहे. हिंदू मंदिराच्या खांबांमध्ये थोडासा बदल करून नवीन रचनेसाठी वापरण्यात आला. खांबावरील नक्षीकाम पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथे असे 32 शिलालेख सापडले आहेत जे जुन्या हिंदू मंदिराचे आहेत.