अंतर्गत राजकारणामुळे CID मालिका बंद पाडण्यात आली? दयाने सांगितलं सत्य
मुंबई : ‘सीआयडी’ हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होता. या मालिकेचा पहिला एपिसोड 1998 मध्ये प्रसारित झाला. तेव्हापासून तब्बल 1500 एपिसोड्स ऑन एअर करण्यात आले. आजही या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सीआयडी एका नव्या सिझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावा, अशी असंख्य जणांची इच्छा आहे. तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2018 मध्ये या मालिकेने निरोप घेतला. या मालिकेतील दयाची भूमिका साकारणारा अभिनेता दयानंद शेट्टी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मालिकेविषयी मोठा खुलासा केला आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.
‘सीआयडी’ या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, अलाना सय्यद, अजय नागरथ, दिनेश फडणीस, तान्या अब्रॉल यांसारख्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. युट्यूबर लक्ष महेश्वरीला दिलेल्या मुलाखतीत दयानंदने मालिका संपण्यामागचं धक्कादायक कारण सांगितलं आहे. अंतर्गत राजकारणामुळे ही मालिका बंद करण्यात आली, असं त्याने म्हटलंय.
याविषयी बोलताना दया म्हणाला, “आम्हाला असं वाटतं की 21 वर्षांपासून ज्या गतीने आणि ज्या क्रेझने ही मालिका सुरू होती, त्यानुसार ती बंद करायला पाहिजे नव्हती. यात काही अंतर्गत राजकारण असू शकतं किंवा मी याला नियती असं म्हणेन. तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की कुठेतरी ही मालिका बंद पाडण्यात आली.”
‘सीआयडी’ ही टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही मालिका बरीच वर्षे चालली असली तरी त्यात काही कलाकार सतत बदलत गेले. असं असूनही अवघे काही वर्षे काम केलेल्या कलाकारांनाही यशस्वी करिअर मिळालं. 2018 मध्ये मालिका बंद झाल्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा CID चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.