मंदिरात प्रवेश ते मोफत प्रसाद…; अयोध्येत रामलल्लाचं दर्शन कसं घ्याल? वाचा संपूर्ण माहिती…
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिरात भाविक गर्दी करत आहेत. 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते महापूजा झाली. यानंतर भाविक मोठ्या संख्येने अयोध्या नगरीत येत आहेत. रामलल्लाचं दर्शन घ्यायचं इतकाच ध्यास या भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र राम मंदिरात जाण्यापासून दर्शन घेण्यापर्यंत आणि प्रसाद घेण्यापर्यंतची प्रक्रिया या भक्तांसाठी नवी आहे. ही प्रक्रिया कशी आहे? रामलल्लाचं दर्शन घेताना कसं जावं लागतं? हे जाणून घेऊयात…
राम मंदिरात प्रवेश कसा कराल?
राम मंदिरात जाताना पाच सुरक्षेचे टप्पे आहेत. इथे तुमची तपासणी होते. सिंह द्वारातून तुम्हाला राम मंदिरात प्रवेश मिळतो. इथं 32 पायऱ्या आहेत. वृद्ध किंवा अपंग व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी इथे व्हीलचेअरची सुविधा देखील उपलब्ध आहेत. राम मंदिरातील आरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला पास घ्यावा लागतो. या पाससाठी तुम्हाला आयडी प्रुफ द्यावा लागतो. आयडी प्रुफ दिल्यानंतर तुम्हाला पास दिला जातो. हा पास असेल, तरच तुम्ही रामलल्लाच्या आरतीत सामील होऊ शकता.
आरतीची वेळ काय?
राम मंदिर परिसरात मोफत प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. राम जन्मभूमी ट्रस्टकडून मोफत प्रसाद दिला जातो. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर भक्त बाहेर आले की, त्या ठिकाणी प्रसाद दिला जातो. रामलल्लाची दररोज आरती होते. मंगला आरती सकाळी 4. 30, श्रृंगार आरती, सकाळी 6.30-7 यावेळात होते. भोग आरती सकाळी 11. 30, संध्या आरती संध्याकाळी 6.30, भाग आरती रात्री 9, शयन आरती रात्री 10 वाजता होते.
या वस्तू घेऊन जायला बंदी
सुरक्षेच्या कारणास्तव काही ठराविक वस्तूच तुम्ही राम मंदिर परिसरात घेऊन जाऊ शकता. मंदिरात जाताना पैसे, चश्मा घेऊन जाऊ शकता. तसंच काही वस्तू घेऊन जाण्यावर बंदी आहे. रामलल्लाच्या दर्शनावेळी फोन, चार्जर, वॉलेट, चावी, इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन जायला बंदी आहे. राम मंदिर परिसरात गेलात आणि या पैकी काही वस्तू तुमच्याकडे असतील. तर तिथल्या लॉकरमध्ये तुम्ही या वस्तू ठेवू शकता. यासाठी कोणतीही रक्कम आकारली जात नाही.